Ad will apear here
Next
इतिहास-पुराणातील दत्तात्रेय
‘दत्त संप्रदायाचा इतिहास’ हा लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून सिद्ध झालेला ग्रंथ. श्री दत्त या अत्यंत लोकप्रिय आणि अद्भुत दैवताचे संशोधनात्मक दर्शन त्यांनी या पुस्तकातून घडविले आहे. या पुस्तकातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.
......... 
प्राचीन कल्पनेप्रमाणे रामायण व महाभारत या ग्रंथांना ‘इतिहास’ अशी संज्ञा आहे. या दोन पंथांपैकी महाभारतात दत्तात्रेयाचे उल्लेख आढळतात आणि पुराणकाळातच दत्तात्रेय या देवतेची निर्मिती झाली असल्यामुळे अनेक पुराणांत दत्तात्रेयाची चरित्रकथा वर्णिली आहे. येथे ‘चरित्रकथा’ हा शब्द मी अगदी स्थूल अर्थाने वापरला आहे. कारण कोणत्याही पुराणात दत्तात्रेयाचे साद्यन्त चरित्र वर्णिलेले नाही.

तो विष्णूचा अंश असून, अत्री-अनसूयेचा पुत्र होय, ही गोष्ट मात्र प्राय: सर्वमान्य आहे. परंतु तो अयोनिसंभव आहे, की अनसूयेच्या उदरी जन्मला, या बाबतीत मात्र भिन्न मते आढळतात. बहुतेक पौराणिक उल्लेखांत कार्तवीर्य सहस्रार्जुन त्याच्या कृपाप्रसादाने आणि वरदानाने बलशाली सम्राट बनला, ही घटना आढळते.

महाभारतात वनपर्वात (११५.१२),शांतिपर्वात (४९.३६.३७) आणि अनुशासनपर्वात (१५२.५ व १५३.१२) दत्तात्रेयाने सहस्रार्जुनावर केलेल्या कृपेचे उल्लेख आहेत. अनुशासनपर्वाच्या ९१व्या अध्यायात मात्र एक विशेष उल्लेख आला आहे :

स्वायंभुवोऽत्रि: कौरव्य: परमर्षि: प्रतापवान्।
तस्य वंशे महाराज दत्तात्रेय इति स्मृतः।।४।।
 
दत्तात्रेयस्य पुत्रोऽ भून्निमिर्नाम तपोधन:।
निमेश्वाप्य भवत्पुत्र: श्रीमान् नाम श्रिया युत: ।। ५ ।।

अत्रीच्या वंशात जन्मलेल्या दत्तात्रेयाला निमी नावाचा पुत्र होता आणि निमीला श्रीमान् नावाचा पुत्र होता, ही दत्तात्रेयाच्या गार्हस्थ्यजीवनाविषयीची साक्ष विशेष चिंतनीय आहे. अन्य पुराणांतून क्वचित दत्तात्रेयाबरोबर त्याच्या शक्तीचा वास असल्याचे वर्णन आढळत असले, तरी त्यातून गृहस्थजीवन सूचित होत नाही. तसेच येथे दत्तात्रेय हा ‘अत्रिपुत्र’ आहे असे न म्हणता तो ‘अत्रींच्या वंशातील’ आहे, असे म्हटले आहे. येथे उल्लेखिलेला दत्तपुत्र जो निमी त्याचा पुत्र श्रीमान् हा अकाली मृत्यू पावला. पुत्रशोकाने निमी विव्हळ झाला. या शोकातून मन:शांती मिळविण्यासाठी निमीने श्राद्धकल्पना निर्माण केली, असे पुढे वर्णिले आहे. हा अध्याय श्राद्धकल्पाचे महात्म्य विशद करणारा आहे.

दत्तोऽर्जुनाय तपते सप्तद्वीपमहीशताम्।
ददौ बाहुसहस्रं च ह्यजेयत्वं रणे तथा।।

‘तप करणाऱ्या कार्तवीर्य अर्जुनाला दत्तात्रेयाने सप्तद्वीपांकित पृथ्वीचे राज्य, सहस्रबाहू आणि युद्धात अजेयत्व दिले,’ ही अग्निपुराणातील (२७५.५) माहिती इतर पुराणांतून कमी-अधिक विस्ताराने आली आहे. अर्थात ही माहिती कार्तवीर्यचरित्राच्या अनुषंगाने आलेली आहे. दत्तात्रेयाने कार्तवीर्यावर कृपा करून, त्याला समर्थ बनवून त्याच्याकरवी आपले चरित्रहेतू सफळ केले. दत्तात्रेयाच्या या अवतार-हेतूंची कल्पना ब्रह्मपुराणातील (२१३.१०६-११२) खालील उताऱ्यावरून येईल :

भूयो भूतात्मनो विष्णो: प्रादुर्भावो महात्मन:।
दत्तात्रेय इति ख्यात: क्षमया परया युतः।।
तेन नष्टेषु वेदेषु प्रक्रियासु मखेषुच।
चातुर्वर्ण्ये च संकीर्णे धर्मे शिथिलतां गते।।
अतिवर्धति चाधर्मे सत्ये नष्टेऽनृते स्थिते।
प्रजासु शीर्यमाणासु धर्मे चाकुलातां गते।। 
सयज्ञा: सक्रिया: वेदा: प्रत्यानीता हि तेन वै।।
चतुर्वर्ण्यमसंकीर्णं कृतं तेन महात्मना।। 

(जो सर्व भूतमात्राचा अंतरात्मा आहे, त्या विष्णूचा दत्तात्रेय नामक अवतार झाला. हा अवतार क्षमाप्रधान होता. त्याने वेदांना प्रतिष्ठा मिळवून दिली; यज्ञसंस्थेचे उज्जीवन केले; चातुर्वर्ण्यातील शैथिल्य दूर केले; अधर्म आणि असत्य यांचा उच्छेद केला आणि क्षीण होत चाललेल्या प्रजेत सामर्थ्य निर्माण केले.) 

याच अवतारहेतूंचे अधिक स्पष्टीकरण विष्णुधर्मोत्तर पुराणात (१.२५.६-१६) आले आहे. कार्तवीर्याने दत्तात्रेयाकडून प्राप्त झालेल्या वरांच्या बळावर राज्य हतकंटक बनविले आणि आर्यावर्तातील भूमि ‘निर्म्लेंच्छ केली (‘आर्यावर्तेषु निर्म्लेच्छा कृता तेन वसुन्धरा।’) हा विष्णुधर्मोत्तर पुराणातील (१.२५.१६) उल्लेख चिंतनीय आहे.

मार्कंडेय पुराणातील दत्तात्रेय-चरित्र मात्र काहीसे विलक्षण आहे. या पुराणात, ब्रह्मा-विष्णू-महेशांच्या वरदानाने अनुक्रमे सोम, दत्त आणि दुर्वास हे तीन अत्रिपुत्र निर्माण झाले, अशी हकीकत दिल्यावर पुढे एक विलक्षण घटना वर्णिली आहे :

मुनिपुत्रवृत्तो योगी दत्तात्रेयोऽप्यसङ्गिनम।
अभीप्स्यमान: सरसि निममज्ज चिरं प्रभु:।।
तथापि तं महात्मानमतीव प्रियदर्शनम् ।
तत्यर्जन कुमारास्ते सरस्तीरमाश्रिता:।।
दिव्ये वर्षशते पूर्णे यदा ते न त्यजन्ति तम्।
तत्प्रित्या सरस्तीरं सर्वे मुनिकुमारका:।। 
ततो दिव्याम्बरधरां चारूपीननितम्बिनीम्।
नारीमादाय कल्याणीमुत्ततार जलान्मुनि:।।
स्त्रीसन्निकर्षाधेते परित्यक्षन्ति मामिति।
मुनिपुत्रास्त्ततोऽसङ्गी स्थास्यामीति विचिन्तयन्।।
तथापि तं मुनिसुता न त्यजन्ति यदा मुनिम् ।
तत: सह तया नार्य्या मद्यपानमथापिबत् ।।
सुरपानरतं ते न सभार्य्यं तज्यजुस्तत:।
गीतवाद्यादिवनिता भोगसंसर्गदूषितम्।।
मन्यमाना महात्मानं तया सह बहिष्क्रियम् ।
नावाप दोषं योगीशो वारुणीं स पिबन्नपि ।।

(दत्तात्रेयाच्या तेजस्वी स्वरूपामुळे मुनिकुमारांचा मेळा सतत त्याच्याभोवती वावरत असे. ‘अरतिर्जनसंसदि’ या वृत्तीमुळे दत्तात्रेयाने त्यांना टाळून एकांतवास मिळविण्यासाठी एका सरोवरात बुडी मारली. ते मुनिकुमार त्या प्रियदर्शन महात्म्याच्या पुनर्दर्शनाची वाट पाहत दीर्घकाळपर्यंत (दिव्ये वर्षशते पूर्णे) सरोवराच्या तीरावर तिष्ठत राहिले. ते आपली प्रतीक्षा सोडीत नाहीत, असे पाहून दत्तात्रेय मुनी एका दिव्य वस्त्रे नेसलेल्या अत्यंत सुंदर तरुणीसह जळातून बाहेर आले. ‘आपल्याबरोबर एक स्त्री आहे असे पाहून हे मुनिकुमार आपला त्याग करतील आणि आपल्याला पुन: ‘असङ्गी’ अवस्थेत राहता येईल,’ अशी दत्तात्रेयाची कल्पना होती; परंतु तशाही अवस्थेत मुनिकुमार आपणास सोडून जात नाहीत, असे पाहून त्या तरुणीबरोबर दत्तात्रेयाने मद्यपान करावयास प्रारंभ केला. परंतु ‘जो योगेश्वर आहे, त्याला सुरापान वा गीतवाद्यादि वनिताभोग यांच्या संसर्गाने दोष लागत नाही. त्या विष्णुस्वरूप दत्तात्रेयाने योगस्थ बनून विषयांचा उपभोग घेतला (‘दत्तात्रेयोऽपि विषयान् योगस्थो बुभुजे हरि:।’) असे आणखी एका ठिकाणी (१७.१५) या पुराणात उल्लेखिले आहे. 

(‘दत्त संप्रदायाचा इतिहास’ हा ग्रंथ ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZERCH
Similar Posts
वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज रचित श्री दत्तात्रेय स्तोत्राचे विवेचन परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांनी रचलेले श्री दत्तात्रेय स्तोत्र अद्भुत आहे आणि त्यात प्रचंड अर्थ सामावलेला आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणारे सद्गगुरू श्री. वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी या स्तोत्रातील प्रत्येक शब्दाच्या अर्थासह व्यापक विवेचन करणारे पुस्तक लिहिले आहे
वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज रचित श्री दत्तात्रेय स्तोत्राचे विवेचन परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांनी रचलेले श्री दत्तात्रेय स्तोत्र अद्भुत आहे आणि त्यात प्रचंड अर्थ सामावलेला आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणारे सद्गगुरू श्री. वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी या स्तोत्रातील प्रत्येक शब्दाच्या अर्थासह व्यापक विवेचन करणारे पुस्तक लिहिले आहे
चैतन्यस्पर्श ‘आपण सापाला घाबरतो, त्याच्या हजारपट जास्त तो आपल्याला भितो. आणि त्या भीतीपोटी तो जी डिफेन्स मेकॅनिझम वापरतो म्हणजे फणा उगारून फुत्कारतो त्याने आपण घाबरतो. आज मुक्काम कर, तुला उद्या बापूसाहेबांना भेटवतो...’ ‘कोण बापूसाहेब? योगी वगैरे आहेत का?’ ‘छे रे, बापूसाहेब म्हणजे एक भुजंग आहे.. जुना... नव्वद वर्षे वयाचा सर्प आहे
अवघे हरिमय योगबळे सुधीर काळे यांनी लिहिलेल्या ‘अवघे हरिमय योगबळे’ या कादंबरीची द्वितीय आवृत्ती आणि ई-बुकच्या प्रकाशनाचा सोहळा २९ डिसेंबर २०१९ रोजी पुण्यात होणार आहे. बुकगंगा पब्लिकेशन्सतर्फे हे पुस्तक प्रकाशित होत आहे. अध्यात्माचा आनंदमय प्रवास या कादंबरीत मांडण्यात आला आहे. हिमालयाच्या संगतीने घेतलेल्या स्वतःच्या आणि परमोच्च सुखाच्या शोधाची ही अद्भुत कहाणी आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language